शासकीय मुद्रण व लेखनसामग्री विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. मुद्रण व लेखनसामग्री विभाग हा मूलत: सेवा विभाग असून तो शासनाच्या कामकाजाच्या सर्वसाधारण परिचालनासाठी आवश्यक असलेल्या व त्याचाच एक भाग असलेल्या विभागांच्या प्रकारात मोडतो. तथापि, शासकीय मुद्रणालयांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने व शासकीय मुद्रणालयांकडे मुद्रणासाठी साहित्य पाठवणाऱ्या शासकीय विभागांना खर्चाच्या संबंधात योग्य जाणीव करून देण्यासाठी व जबाबदारीची अधिक जाणीव त्यांना व्हावी म्हणून शासनाने मुद्रण विभाग हा सेवा आणि वाणिज्यिक विभाग असल्याचे घोषित केले आहे.
शासकीय मुद्रण व लेखनसामग्री विभागाची स्थापना पुढील प्रयोजनार्थ करण्यात आली आहे :-
- महाराष्ट्र शासनाचे मुद्रणाचे आणि पुस्तक बांधणीचे कामकाज पार पाडणे व त्यावर देखरेख करणे.
- महाराष्ट्र शासन राजपत्र, अधिनियम, नियम, अहवाल, नकाशे, वैज्ञानिक , सामाजिक आणि सांस्कृतिक इत्यादी वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके प्रकाशित करणे आणि त्यांची विक्री करणे.
- राज्यातील शासकीय कार्यालयांना लेखनसामग्री, रेखाचित्र सामग्री, पोशाखाचे कापड, छत्र्या, सायकली व उपसाधने, भिंतीवरील घड्याळे, गजराची घड्याळे, प्रतिलिपी यंत्रे आणि शासकीय प्रकाशने यांचा पुरवठा करणे.
- शासकीय कार्यालयांमधील टंकलेखन यंत्रे, प्रतिलिपी यंत्रे, सायकली, घडयाळे आणि गजराची घडयाळे यांची दुरुस्ती करणे आणि दर तीन महिन्यांनी टंकलेखन यंत्राचे संधारण पार पाडणे.
संचालक, शासकीय मुद्रण व लेखनसामग्री हे विभाग प्रमुख असून वर उल्लेखलेल्या विषयांच्या संबंधात त्यांची अधिकारिता राज्यभर आहे.